
लोणी काळभोर, दि. ३० (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे खेळत असताना पाण्याच्या चारीत पडून अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोहम लखन कसबे (वय १ वर्षे १० महिने, रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम हा घराजवळील परिसरात खेळत होता. यावेळी खेळता खेळता तो ग्रामपंचायतीने खोदलेल्या पाण्याच्या चारीत पडला. संबंधित चारी सुमारे चार फूट खोल असल्याने त्यात पाणी साचले होते. चिमुकला बराच वेळ दिसून न आल्याने कुटुंबीय आणि नागरिकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी तो चारीत आढळून आला.
नागरिकांनी तातडीने सोहमला बाहेर काढून उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे तसेच पोलीस अंमलदार शिवाजी दरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सोहमच्या नातेवाईकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित जबाबदार व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चारीच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे कदमवाकवस्ती परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामपंचायत हद्दीतील उघड्या व असुरक्षित चारी, खड्डे आणि पाणीसाठ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…