July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

​पुणे: बोरीभडक येथे बंदुकीचा धाक दाखवत तरुणीचे अपहरण; घरातील ५ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिनेही लांबवले…

दौंड, यवत (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणीचे तिच्याच घरातून बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर आरोपींनी तरुणीच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करत घरातील ५ लाख १ हजार ५०० रुपयांची रोकड आणि ७ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

​घरात घुसून तरुणीला ओढत नेले

​मिळालेल्या माहितीनुसार, विद्याधर नारायण पवार (वय ६०, रा. बोरीभडक, ता. दौंड) यांनी याप्रकरणी यवत पोलिसात फिर्याद दिली आहे. पवार यांची २३ वर्षीय मुलगी अक्षदा हिचे कमरुद्दीन मुकीम शेख (रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी मिळून अपहरण केले. २ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी पवार यांच्या राहत्या घरात घुसले आणि अक्षदा हिला तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने ओढत नेऊ लागले.

​बंदुकीचा धाक आणि कुटुंबीयांना मारहाण

​मुलीला वाचवण्यासाठी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, मुख्य आरोपी कमरुद्दीन शेख याने थेट पिस्तूल (आर्म्स) काढून पवार यांच्यावर रोखले आणि ‘मधे आलात तर गोळ्या घालून ठार मारीन’ अशी धमकी दिली. यावेळी आरोपींनी वृद्ध आजोबांना ढकलून देत मारहाण केली, तर फिर्यादींच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. या दहशतीच्या वातावरणात आरोपींनी अक्षदाला जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात बसवले आणि तेथून पळ काढला.

​जाताना आरोपींनी पवार यांच्या घरातील ५,०१,५०० रुपयांची रोकड आणि अंदाजे ७ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण असा मोठा ऐवजही चोरून नेला.

​पोलिसांकडून गुन्हा दाखल, शोध सुरू

​या धक्कादायक प्रकारानंतर पवार कुटुंबीयांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी ३ जुलै रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७९, ३०९(२), ३३३, ११५(२), १३८, ३५१(२), ३(५) आणि आर्म्स ॲक्ट ४(२५) अंतर्गत अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

​पोलीस उपनिरीक्षक दशरथ नंदीवाले यांनी हा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. फरार आरोपींचा आणि अपहृत तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

Spread the love