July 30, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: डेक्कन पोलिसांची धडक कामगिरी; २४ तासांत दोन सराईत दुचाकी चोर गजाआड, चोरीच्या २ मोटारसायकल जप्त…

पुणे: पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत तत्परता दाखवत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त केल्या असून, यामुळे पुणे शहरातील दोन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

२४ तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

​डेक्कन पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एका फिर्यादीने आपली होंडा ॲक्टिव्हा दुचाकी लॉक करून पार्क केली असता, अज्ञात चोरांनी ती चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. १९९/२०२६) नोंदवण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलिसांच्या तपास पथकाने चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१. आकाश अरविंद गुजर (वय २८ वर्षे, रा. आंबेगाव खुर्द, पुणे)

२. ईब्राहिम ईस्माईल शेख (वय ३५ वर्षे, रा. भाग्यनगर, कोंढवा, पुणे)

चोरीच्या दोन दुचाकी जप्त; विश्रामबाग आणि डेक्कनचे गुन्हे उघड

​अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांच्याकडून चोरीची एक होंडा ॲक्टिव्हा आणि काळ्या रंगाची ‘ड्रीम युगा’ मॉडेलची मोटारसायकल अशी दोन वाहने जप्त करण्यात आली.

​या दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे खालील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत:

  • विश्रामबाग पोलीस स्टेशन: गु.र.नं. २२२/२०२६ (भा.न्या.सं.क. ३०३(२))
  • डेक्कन पोलीस स्टेशन: गु.र.नं. १९९/२०२६ (भा.न्या.सं.क. ३०३(२), ३(५))

या पोलीस पथकाने केली कारवाई

​सदरची उल्लेखनीय कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१) कृषिकेश रावळे, आणि सहा. पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​तसेच डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल गुल्ला आणि पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अजय भोसले, योगेश मोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, महेश काळे, संजय दंडगुले, स्वप्निल गायकवाड आणि महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर यांनी ही यशस्वी कारवाई केली.

Spread the love