
पुणे (सुनित जैनजांगडे): पुण्यातील कोथरुड परिसरातील केळेवाडी येथून घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने शिताफीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपीकडून ११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला अलंकार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सोमनाथ भगवान मोरे (वय ३२, रा. वसंतनगर, विटेकर फॅब्रिकेशन जवळ, केळेवाडी, कोथरुड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून धडक कारवाई
दिनांक १७ जुलै २०२६ रोजी पौड फाट्याजवळील ‘विघ्नहर कॉम्प्लेक्स’मधील पहिल्या मजल्यावरील बंद घरात घरफोडी झाली होती. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पथक करत होते.
तपासादरम्यान, पोलीस अंमलदार अमित गद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, भंगार गोळा करण्याचे काम करणारा सोमनाथ मोरे हा त्याच्या वसंतनगर येथील घरी आहे आणि त्यानेच ही चोरी केली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमित गद्रे आणि शिवाजी सातपुते यांनी वसंतनगर येथे धाड टाकून संशयिताला ताब्यात घेतले.
चोरीची कबुली आणि मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाने आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने १७ जुलै रोजी पौड फाट्यावरील घरामध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला ११,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे ३) श्री. शंकर खटके यांच्या सूचनेनुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमित गद्रे व शिवाजी सातपुते यांनी केली.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…