
लोणी काळभोर (पुणे):
थेऊरफाटा-थेऊर रोडवरील उड्डाणपुलाला काही दिवसांपूर्वी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांची आणि निर्माण झालेल्या समस्यांची गंभीर दखल घेत शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या दुरुस्ती कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या पुलाच्या संरक्षणात्मक कामाचा आढावा घेताना, आमदारांनी प्रशासनाला कामात गती राखण्यासोबतच उच्च दर्जा कायम ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करून सुरक्षित वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची मागणी लावून धरली होती.
नागरिकांच्या या समस्यांची तात्काळ दखल घेत आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
दोन टप्प्यांत होणार उड्डाणपुलाचे काम
सध्या सुरू असलेले काम हे पुलाला गेलेल्या तड्यांना आधार देण्यासाठीच्या संरक्षक भिंतीचे आहे. पावसाळा संपल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत पुलाच्या मुख्य कामाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात थेऊर बाजूकडील तडा गेलेला भाग पूर्णपणे काढून तो नव्याने उभारला जाणार आहे. या कालावधीत काही काळ हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती सभापती युवराज काकडे यांनी दिली आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…