September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२कडून अटक…

पुणे : पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने ताब्यात घेतले. अनिकेत उत्तम जावीर (वय २३, रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढ्याजवळ, सहकारनगर, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मे २०२६ रोजी जय आंबे चौक, पद्मावती, पुणे येथे धारदार शस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गु.र.नं. २०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अनिकेत जावीर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस अंमलदार महेश मंडलिक, कुंदन शिंदे आणि संदिप शिर्के यांना आरोपी आंबील ओढ्याजवळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

ही माहिती युनिट-२चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने आंबील ओढ्याजवळ कारवाई करून संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अनिकेत उत्तम जावीर असल्याचे सांगितले. गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातुपते, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Spread the love

You may have missed