March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

उत्तराखंड ढगफुटी प्रकरण : बेपत्ता अग्निवीर जवानाचा मृत्यू गृहीत; कुटुंबीयांनी प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला

उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर बेपत्ता असलेल्या अग्निवीर जवान सचिन पोनियाला चार महिन्यांनंतर मृत घोषित करण्यात आले असून या निर्णयावर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे.

उत्तराखंड : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या भीषण पुरात बेपत्ता झालेल्या अग्निवीर जवानाला जिल्हा प्रशासनाने मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या निर्णयाला जवानाच्या कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

अग्निवीर जवान सचिन पोनिया (वय २३) हा उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील रहिवासी होता. ऑगस्ट महिन्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल गाव परिसरात झालेल्या ढगफुटीनंतर सचिन पुरात वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्या दिवसापासून तो बेपत्ता असून, चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही. तसेच त्याचा मृतदेहही अद्याप सापडलेला नाही.

या पार्श्वभूमीवर उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांनंतर सचिनचा मृत्यू झाल्याचे गृहीत धरत त्याला अधिकृतरित्या मृत घोषित केले आहे. मात्र, कोणताही ठोस पुरावा समोर नसताना मृत घोषित करणे चुकीचे असल्याचा दावा सचिनच्या कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

उत्तरकाशी प्रशासनाकडून मृत घोषित केल्याचे पत्र मिळाल्यानंतर, उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा प्रशासनाने या निर्णयावर आक्षेप मागवण्यासाठी नोटीस जारी केली आहे. हाथरसचे उपविभागीय अधिकारी (SDM) राज बहादूर सिंह यांनी सांगितले की, “जर कोणाला सचिन पोनिया याला मृत घोषित करण्यावर आक्षेप असेल, तर ३० दिवसांच्या आत एसडीएम कार्यालयात लेखी आक्षेप सादर करता येईल.”

हाथरस जिल्ह्यातील करील गावातील सचिन पोनिया हा अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात भरती झाला होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची पहिली नियुक्ती उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात झाली होती. सैन्यात भरती होण्यापूर्वी सचिनने पदवी शिक्षण पूर्ण केले होते आणि घटनेपूर्वी तो सुमारे साडेनऊ महिन्यांपासून उत्तराखंडमध्ये कार्यरत होता.

🗣 सचिनच्या वडिलांची प्रतिक्रिया :

सचिनचे वडील चंद्रवीर सिंह यांनी प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.“माझा मुलगा ऑगस्टपासून बेपत्ता आहे. अजूनही तो जिवंत नाही, याचा कोणताही पुरावा नाही. तरीही प्रशासनाने काही चौकशीनंतर त्याला मृत घोषित केले. हे आम्हाला मान्य नाही,” असे त्यांनी सांगितले.

“आम्ही अजूनही सचिन सुरक्षित परत येईल, याची आशा सोडलेली नाही. मात्र, सरकारकडून मृत घोषित केल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्हाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. प्रशासनाने ३० दिवसांत आक्षेप नोंदवण्याची संधी दिली असून, कुटुंबीयांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सचिन सुरक्षित घरी परत येईल, अशी आशा कुटुंबीय अजूनही व्यक्त करत आहेत. मात्र, त्याच्या मृत्यूच्या अधिकृत घोषणेमुळे कुटुंबीयांचे दुःख अधिकच वाढले आहे. सचिन बेपत्ता झाल्यापासून कुटुंब उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Spread the love