मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व टिकवण्यासाठी युतीत काही जागा सोडाव्या लागतात, मात्र वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे फूट पडू देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

मुंबई :
मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी युती अपरिहार्य असून, त्या प्रक्रियेत काही जागा नाईलाजाने सोडाव्या लागू शकतात. मात्र वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी पक्षात फूट पडू देऊ नका, असे स्पष्ट आणि भावनिक आवाहन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
एका पक्षीय कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई आज परक्यांच्या हातात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर तुझे-माझे आणि व्यक्तिगत स्वार्थाला प्राधान्य दिले, तर त्याचा थेट फायदा विरोधकांना होईल. त्यामुळे कुणीही फुटता कामा नये, हीच भूमिका त्यांनी ठामपणे मांडली.
युती आणि आघाडीच्या राजकारणात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतातच असे नाही. कधी कधी हक्काच्या जागाही सोडाव्या लागतात. मात्र वाईटपणा आला तरी महाराष्ट्राचे भले आणि मराठी माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावे लागतात, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युती झाल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्ते भाजप किंवा शिंदे गटाकडे वळत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली. भाजप आणि काँग्रेससोबतच्या पूर्वीच्या अनुभवांचा उल्लेख करत, महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेसाठी मनसेसोबत युती केल्याचे त्यांनी सांगितले.
या युतीचा मुख्य उद्देश मुंबईवरील मराठी माणसाचे नेतृत्व कायम राखणे हाच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यापूर्वी मुंबई महापालिकेवर मराठी महापौरच बसणार, असे स्पष्ट केले आहे. मुंबई कोणाच्याही हातात हिसकावू देणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
“एकदा माझ्या खुर्चीत बसून पाहा आणि चार लोक निवडून दाखवा, म्हणजे जबाबदारी काय असते ते कळेल,” असे सांगत त्यांनी विभागप्रमुख आणि शिवसैनिकांनी डगमगू नये, असे आवाहन केले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी जगाच्या नजरेत वाईट ठरलो तरी चालेल, पण आपली ताकद विखुरली जाऊ देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोरोना काळात करण्यात आलेल्या जनसेवेची माहिती देणारी पुस्तिका शिवसेना भवन येथे प्रकाशित करण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर, प्रवक्ते हर्षल प्रधान, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

More Stories
एकच फर्मान आणि 32 जणांची उचलबांगडी; नेमकं लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये घडलं काय?
आजचे राशीभविष्य | शुक्रवार, 30 जानेवारी 2026 | आज नशीब कोणाच्या बाजूने?
आजचे राशीभविष्य | मंगळवार, २७ जानेवारी २०२६ | आज नशीब कोणाच्या बाजूने?