Ajit Pawar criticized BJP over Pune and Pimpri-Chinchwad civic governance, alleging poor planning, rising project costs, and administrative failure during BJP rule

पुणे :
राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका करत, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर चिन्ह वाटपानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, गेल्या जवळपास नऊ वर्षांपासून आम्ही विरोधी पक्षात होतो, तर भाजप सत्तेत होता. या काळात झालेल्या कारभाराची माहिती पुणेकरांसमोर येणं गरजेचं आहे.
भाजपच्या सत्ताकाळात प्रशासनात निष्क्रियता आणि शिथिलता आली असल्याचा आरोप करत, प्रशासक काळातील समस्यांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, मतदार लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या निकषांवर मतदान करतात. नगर पालिका, महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक कारभार आणि सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचा विचार केला जातो.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दाखला देत अजित पवार म्हणाले की, २५ वर्षांच्या सत्ताकाळात शहराचा नियोजित विकास केला. कठोर निर्णय घेतले, मात्र ते शहराच्या हितासाठीच होते. योग्य नियोजनामुळे पिंपरी-चिंचवडमधील रस्ते रुंद झाले आणि वाहतुकीची समस्या तुलनेने कमी आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांवर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असतं. भाजपच्या एकहाती सत्ताकाळात मेट्रो, रिंग रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत ठोस पाठपुरावा झाला नाही, असा आरोप त्यांनी केला.
रिंग रोड प्रकल्पाच्या खर्चावरही अजित पवार यांनी बोट ठेवलं. सुरुवातीला सुमारे १० हजार कोटींचा असलेला हा प्रकल्प आज ४० हजार कोटींवर गेला असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबत एसटीपी प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले नाही, कामांचा वेग अत्यंत मंद राहिला, असा आरोपही त्यांनी केला.
तीन सत्ताकेंद्रे असूनही प्रभावी पाठपुरावा न झाल्याने पाणीपुरवठा, रस्ते आणि वाहतूक नियोजन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर पुणेकरांना त्रास सहन करावा लागत असल्याचं अजित पवार यांनी यावेळी ठामपणे मांडलं.

More Stories
लोणी काळभोरमधील सिद्राम मळा परिसरात चोरट्यांचा वावर; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी