July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: बुलेट, KTM सारख्या महागड्या दुचाकी उडवणारी टोळी जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांकडून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून बुलेट, केटीएम (KTM) आणि स्प्लेंडर सारख्या महागड्या व लोकप्रिय दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या (येरवडा, पुणे) तपास पथकाला मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल ५,००,००० रुपये किमतीच्या एकूण ०८ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

नेमकी काय आहे घटना?

​लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र कदम यांनी तपास पथकाला पेट्रोलिंग वाढवून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, १२ जुलै २०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३४ अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१५० हून अधिक CCTV कॅमेऱ्यांची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषण

​गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार सुरज ओंबासे आणि अमोल वायाळ यांनी घटनास्थळासह पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील तब्बल ५० किलोमीटर अंतरावरील १५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे संशयित आरोपींची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) निखिल पवार यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचे नेमके लोकेशन शोधून काढले.

तारकेश्वर टेकडीजवळ रचला सापळा

​मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, तपास पथकाने लक्ष्मीनगर, येरवडा येथील तारकेश्वर टेकडीवरील ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला आणि दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१) सागर संजय शेळके (वय १९ वर्षे, रा. नित्यानंद बिल्डिंग, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ पत्ता: टाकळी खंडेश्वरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर)

२) करण अधिराज धुमाळ (वय २३ वर्षे, रा. नित्यानंद बिल्डिंग, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ पत्ता: मन्मदापूर, ता. परळी, जि. बीड)

जप्त केलेला मुद्देमाल व उघड झालेले गुन्हे:

अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडून बुलेट, KTM आणि स्प्लेंडर प्लस अशा एकूण ०८ मोटारसायकल (किंमत ५,००,००० रुपये) पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे, तसेच पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ५ गुन्हे असे एकूण ०८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस पथक

​सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०४) श्री. चिलुम्युला रजनीकांत, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्री. सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते, सपोनि निखिल पवार, सपोनि दत्तात्रय लिगाडे, तसेच पोलीस अंमलदार यशवंत खंदारे, श्रीनाथ कांबळे, अतुल जाधव, राहुल परदेशी, भिमराव कांबळे, सुरज ओंबासे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, किरण भागीत, अमोल वायाळ, अक्षय शिंदे आणि सचिन कुचेकर यांच्या पथकाने केली आहे. 

Spread the love