September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: लक्झरी कारची काच फोडून चोऱ्या करणारी परराज्यातील टोळी गजाआड; विमानतळ पोलिसांची धडक कारवाई…

पुणे: शहरातील नामांकित मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून आतील मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या तामिळनाडूतील एका आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात पुणे शहर पोलिसांच्या विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मोठे यश आले आहे. या टोळीने पुण्यातील फिनिक्स मॉलच्या पार्किंगमधून एका पोर्श (Porsche) कारची काच फोडून चोरी केली होती.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी तक्रारदाराने त्यांची पोर्श कंपनीची महागडी कार विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या पार्किंगमध्ये लावली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजूची पुढील खिडकीची काच फोडून आत ठेवलेली लॅपटॉप बॅग, सॅमसंग कंपनीचा झेड फोल्ड (Samsung Z Fold) मोबाईल आणि रोख ४०,००० रुपये असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोशल मीडिया आणि CCTV च्या मदतीने शोध

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांनी तपास पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व अंमलदारांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची सखोल पाहणी केली. सीसीटीव्हीमध्ये संशयास्पदरीत्या दिसणाऱ्या इसमांचे फोटो पोलिसांनी सोशल मीडियाच्या विविध ग्रुप्सवर पाठवून त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली.

खराडी बायपासजवळ आवळल्या मुसक्या

​९ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, संबंधित संशयित आरोपी खराडी बायपास परिसरात थांबलेले आहेत. या माहितीच्या आधारे तपास पथकाने तात्काळ सापळा रचून तीन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१) राजा आरुमुग्गम (वय ४७ वर्षे, रा. त्रिची, तामिळनाडू)

२) लक्ष्मणन एस. संथाकुमार ए. (वय ४० वर्षे, रा. त्रिची, तामिळनाडू)

३) मुथ्थुलिंगम परमानंद लिंगम (वय ४० वर्षे, रा. तंजावर, तामिळनाडू)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

आरोपींकडून पोलिसांना कारची काच फोडण्यासाठी वापरण्यात येणारे विशेष लेडीज चाफ (Ladies Chaf), रबर, छर्रे तसेच ५०,००० रुपयांची रोकड आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

​पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी पुणे शहरातील खराडी व येरवडा परिसर, तसेच लातूर या ठिकाणीही अशाच प्रकारे चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल घागरे करत आहेत.

पोलीस पथक

​सदरची कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, परिमंडळ ०७ चे पोलीस उपायुक्त श्री. अविनाश कुमार, खराडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बोलकोटगी, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, दिलीप पालवे आणि पोलीस अंमलदार योगेश थोपटे, राहुल जोशी, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार, रुपेश पिसळ, लालू कऱ्हे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिनकर गोरे, अंकुश जोगदंड व राजीव टोमपे यांच्या पथकाने केली आहे.

Spread the love

You may have missed