
पुणे: पुण्यातील संचेती चौक परिसरातून रिक्षा (ऑटो कॅब) बुक करत असलेल्या एका नागरिकाचा तब्बल १ लाख ३७ हजार रुपये किमतीचा महागडा ‘आयफोन १७ प्रो’ मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेलेल्या अट्टल चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश सुरेश वाघीरे (वय २१ वर्ष, रा. दळवी हॉस्पिटलच्या बाजूला, शिवाजीनगर, पुणे) असे आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला आयफोन आणि गुन्ह्यात वापरलेली चोरीची सुझुकी ॲक्सेस मोपेड असा एकूण २ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संचेती चौकातील घटना आणि तपास
मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे संचेती चौक येथे ऑटो कॅब बुक करत उभे होते. त्याच वेळी एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गुप्त बातमीदारामार्फत आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि पोलीस अंमलदार महावीर वलटे व दीपक रोमाडे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, संशयीत आरोपी हा गुन्ह्यात वापरलेल्या सुझुकी ॲक्सेस मोपेडसह वेताळबाबा चौकात येणार आहे.
वेताळबाबा चौकात सापळा रचून अटक
मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने वेताळबाबा चौकात सापळा रचला आणि आरोपी आकाश सुरेश वाघीरे याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने संचेती चौकातील मोबाईल चोरीची कबुली दिली. तसेच, गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सेस मोपेड (गाडी क्रमांक: MH 12 RC 3277) ही त्याने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनुसार या वाहनाची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
- आयफोन १७ प्रो मोबाईल फोन (किंमत अंदाजे १,३७,०००/- रुपये)
- सुझुकी ॲक्सेस मोपेड मोटार सायकल (किंमत अंदाजे १,००,०००/- रुपये)
- एकूण जप्त मुद्देमाल: २,३७,०००/- रुपये
आरोपीवर पूर्वगुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला आरोपी आकाश वाघीरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत:
१. विश्रामबाग पोलीस स्टेशन: गु.र.नं. ३१/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२))
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन: गु.र.नं. १७६/२०२५ (भा.न्या.सं. कलम ३०३(२))
३. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन: गु.र.नं. २९८/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०३(२))
या पथकाने केली कामगिरी
सदरची धडक कारवाई अप्पर पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र बनसोडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १) श्री. ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार भाऊ चव्हाण, राजकिरण पवार, महावीर वलटे, इसाक पठाण, दीपक रोमाडे, सचिन जाधव, श्रीकृष्ण सांगवे आणि श्रीकांत मखरे यांच्या तपास पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

More Stories
पुण्यात खळबळ! विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्टल जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक जण जेरबंद…
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले आंतरजिल्हा दरोडेखोर जेरबंद…
दौंड तालुक्यातील दापोडी येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल…