
पुणे: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज काढत दुचाकी चालवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या रोड रोमियांवर पुणे पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत पोलिसांनी एकूण ११ दुचाकी जप्त केल्या असून, त्यांचे मॉडीफाईड फटाका सायलेन्सर जागीच नष्ट केले आहेत. तसेच, गाड्यांमध्ये असे कर्णकर्कश सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी रात्री ११.०० वाजेपासून ते १ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत काळेपडळ परिसरातील कडनगर चौक, न्याती चौक, रहेस्टा विस्टा चौक, उंड्री आणि महंमदवाडी परिसरात काही तरुणांनी बुलेट गाड्या व इतर मोटारसायकलचे सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करत धिंगाणा घातला. धोकादायक पद्धतीने गाड्या चालवून त्याचे रिल्स सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले होते. या कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिक, घरातील लहान मुले आणि वृद्ध रात्री घाबरून दचकून उठले होते. नागरिकांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फोन करून तीव्र तक्रारी नोंदवल्या होत्या.
पोलिसांची कारवाई आणि गुन्हे दाखल
नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनिय बातमीदारांच्या मदतीने या दहशत माजवणाऱ्या दुचाकीस्वारांचा शोध घेतला. पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वार व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांचेविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम २८१, २९२ सह मोटार वाहन कायदा कलम-१८४, १८२ (अ), १९४ (एफ), १९८, १७७, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट कलम ७ आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम कलम १२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच, दुचाकींमध्ये कर्णकर्कश फटाका सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व मो.सा. चे मॉडीफाईड सायलेन्सर काढून ते पूर्णपणे नष्ट केले आहेत. काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या अन्य मोटारसायकल स्वारांचा शोध सध्या सुरूच आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
सदरची ही धडक कामगिरी पोलीस अपर आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर श्री. जीवन बेनिवाल यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. आण्णासो बाबर आणि काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पथकाने (सपोफौ/राजस शेख, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे व अन्य पोलीस अंमलदार) पार पाडली आहे. पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे परिसरातील नागरուकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…