September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: येरवडा पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदेशीर पिस्टल बाळगणारी सराईत टोळी जेरबंद, तीन जण अटकेत…

पुणे: पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एका धाडसी कारवाईत बेकायदेशीरपणे देशी पिस्टल बाळगणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चव्हाण चौक ते मुळीक फार्म रोडवर सापळा रचून पोलिसांनी या तिन्ही संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी पिस्टल, जिवंत काडतूस आणि दुचाकी असा एकूण ९०,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​कारवाईचा घटनाक्रम

​येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश होते. त्या अनुषंगाने २८ जुलै २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार बालाजी सोगे यांना बातमी मिळाली की, तीन इसम चव्हाण चौकाकडून मुळीक फार्मकडे जाणाऱ्या रोडवर मोकळ्या जागेत थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे आणि ते कोणाची तरी वाट पाहत आहेत.

​वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचला. संशयित दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १ देशी बनावटीचे पिस्टल आणि १ जिवंत राऊंड मिळून आला. चौकशीदरम्यान महेश कांबळे याने हे पिस्टल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

  1. महेश अशोक कांबळे (वय २१, रा. प्रज्ञा अपार्टमेंट, हिरागार्डन, भुगाव, पुणे)
  2. गणेश तुळशीराम पवार (वय २२, रा. समर्थ रेसिडेन्सी, लगड कॉलनी, नांदेड सिटी, पुणे)
  3. यश चंद्रकांत उरणकर (वय २२, रा. पॉप्युलर टॉवर, संभाजी चौक, पाषाण, पुणे)

​आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

​या कारवाईत पकडलेल्या आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत:

  • महेश कांबळे: याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात आर्म्स कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे.
  • गणेश पवार: याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व इतर गंभीर कलमांखाली तसेच वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे नोंद आहेत.

​सदर प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनिकांत, आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड व तपास पथकातील अंमलदारांनी पार पाडली.

Spread the love

You may have missed