
नागपूर (प्रतिनिधी : प्रकाश वाघमारे): महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
सुधाकर कोहळे आणि अनिल सोले हे दोघेही भाजपकडून नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाच्या केंद्रीय निवड समितीने कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोहळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने अनिल सोले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, अर्ज मागे घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.
या घडामोडीमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे, काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि अपक्ष अनिल सोले यांच्यातील लढत आता चर्चेचा विषय ठरत आहे.

More Stories
नागपुरात नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींवर मोक्का…
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; मुख्यमंत्री फडणवीस मैदानात…
धम्मचक्र प्रवर्तनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त अभिजीत दिपके यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन…