
नागपूर : टेकानाका परिसरातील होप हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांकडे 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांच्यासह सात जणांविरोधात पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रुग्णालयाचे संचालक डॉ. मुरली कासियामल यांच्या तक्रारीनुसार, उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी रुग्णालयाची बदनामी करण्याची, रुग्णालयाचा परवाना रद्द करवून घेण्याची तसेच इमारत पाडण्याची कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमक्या देत 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणात शरद सरोदे, मनीषा पापडकर, पंकज खिंची, मुल्ला सिंह गौर, प्रतीक बहुगुणा, महेश ढोले आणि शुभम साठे यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या तक्रारीवर वेळेत एफआयआर दाखल न केल्याच्या आरोपावरून पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तक्रारीवर कारवाई करण्यात झालेल्या कथित दिरंगाईची बाबही या प्रकरणात चर्चेत आली आहे.

More Stories
नागपुरात नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींवर मोक्का…
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; मुख्यमंत्री फडणवीस मैदानात…
धम्मचक्र प्रवर्तनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त अभिजीत दिपके यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन…