March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

BMC Election 2026: ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबईत भाजपलाच फायदा; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

BMC Election 2026 च्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपच्या विजयाचा ठाम दावा केला आहे. वाचा सविस्तर बातमी.

Raj Thackeray & Uddhav Thackeray | BMC Election 2026

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 चा प्रचार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, सोमवारपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत प्रचारसभांना सुरुवात करत आहेत. ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरल्याने भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार लढत होईल, अशी अपेक्षा शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपची मुंबईविषयीची राजकीय थिअरी मांडत, “ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी खूप उशीर झाला आहे”, असे मत व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज आणि उद्धव ठाकरे हे त्यांची मतांची ताकद संपल्यानंतर एकत्र आले आहेत. 2009 साली ही युती झाली असती, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. मात्र आता त्यांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की मराठी मतदारही त्यांच्याकडे आकर्षित होणार नाही आणि अमराठी मतदार तर अजिबात नाही.”

त्यांनी पुढे ठामपणे सांगितले की, “ठाकरे बंधू एकत्र आल्याची भाजपला कोणतीही चिंता नाही. मुंबई महानगरपालिकेत भाजपच निवडून येईल.”

मराठी माणसाच्या घराचा मुद्दा उपस्थित

याच मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसांच्या घरांच्या प्रश्नावरही ठाकरे कुटुंबावर टीका केली.
ते म्हणाले, “दक्षिण मुंबईत घरांच्या किंमती परवडत नसल्याने मराठी माणूस तिथून हद्दपार झाला. आम्ही दक्षिण मुंबईतील मराठी कुटुंबांना घरे देत आहोत. फक्त मोर्चे काढून प्रश्न सुटत नाहीत.”

फडणवीसांनी शिवसेनेच्या सत्ताकाळात मराठी माणसांसाठी कोणताही मोठा गृहनिर्माण प्रकल्प झाला नसल्याचा आरोप केला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा उल्लेख करत ते म्हणाले, “आम्ही 80 हजार मराठी नागरिकांना मुंबईबाहेर जाण्यापासून वाचवले. हा प्रकल्प खासगी बिल्डरकडे न देता म्हाडामार्फतच राबवण्याचा निर्णय मी घेतला.”

Spread the love